Ticker

6/recent/ticker-posts

घरफोडीचा थरार! काळ्या पोशाखातील चोरटे २.४९ लाख घेऊन पसार – माहोरात खळबळ


गणेश पगारे 

माहोरा गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली आहे. ही घटना ३० जून रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास घडली असून गावातील रहिवासी पुखराज डिगंबर गव्हले (वय ४०) यांच्या घरात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी घुसून तब्बल ₹२,४९,००० किमतीचा ऐवज चोरी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटना घडली त्यावेळी पुखराज गव्हले हे घरी उपस्थित नव्हते. ही संधी साधत चोरट्यांनी अंधाराचा आणि घरातील शांततेचा फायदा घेतला. शेजारील घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्यानंतर, चोरट्यांनी गव्हले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटे आणि लोखंडी पेटी फोडून ₹२.९ लाखांचे सोन्याचे दागिने (ज्यात नेकलेस, गहूमणी पोत, इतर दागिने) आणि ₹४० हजार रोख रक्कम असा एकूण ₹२.४९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेदरम्यान शेजारी राहत असलेले घनश्याम वाघ यांना रात्री संशयास्पद आवाज ऐकू आल्याने ते जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता काळ्या कपड्यांतील व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले सहा चोरटे गव्हले यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यांनी तत्काळ पुखराज गव्हले यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर गावचे सरपंच गजानन लहाने यांनी जाफ्राबाद पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच उपपोलीस निरीक्षक वासुदेव पवार व चालक डोईफोडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले. सकाळी सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, कॉन्स्टेबल अरुण वाघ, विजय जाधव, जालना येथून आलेले डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथक यांनी घटनास्थळी तपास सुरू केला.

या वेळी स्वान पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाळ, कॉन्स्टेबल सचिन पल्लेवाड, तसेच लुशी डॉग आणि अंगठा मुद्रा (फिंगरप्रिंट) तज्ज्ञांनी संपूर्ण पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली.

सध्या या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरी कुणी केली, त्यामागे कोणत्या टोळीचा हात आहे का, तसेच स्थानिक कोणी यात सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे माहोरा गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या