🔴 पोलीस ठाण्याबाहेरच राडा!
जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या बाहेरच दोन गटांमध्ये जोरदार वाद!
शिवीगाळीनंतर संतप्त आरोपींनी केला जिवघेणा हल्ला!
🧱 डोक्यावर विट मारून गंभीर जखमी!
परमेश्वर सोनुने यांच्यावर आरोपीने विट फेकून हल्ला
जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
जाफ्राबाद पोलीस ठाणे हद्दीतील सावरखेडा येथे वाळूच्या साठ्यावरून निर्माण झालेल्या वादातून एका इसमावर करण्यात आलेल्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.
फिर्यादी दिपक बाबुराव सोनुने (वय ३५, व्यवसाय शेती, रा. सावरखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराच्या मागे सुखदेव सोनुने याने बांधकामासाठी वाळू साठवून ठेवली होती. या वाळूमुळे येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने फिर्यादीची आई लिलाबाई (वय ५८) यांनी राजु सोनुने यास समज देण्यासाठी संपर्क केला. मात्र, राजु आणि त्याचा भाऊ विजय उर्फ विजु यांनी त्यांना शिवीगाळ केली.
या प्रकाराची पोलिसांत तक्रार देण्यासाठी दिपक सोनुने, त्याची आई लिलाबाई, भाऊ सुधाकर आणि परमेश्वर सोनुने असे चौघेजण जाफ्राबाद पोलीस ठाण्यात आले असता, याचवेळी आरोपी राजु सोनुने सुद्धा तेथे आला. त्याने पोलीस ठाण्याबाहेर फिर्यादीच्या आई आणि भावांशी वाद घालून शिवीगाळ केली. पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही पक्षांना ठाण्याच्या बाहेर काढले.
मात्र, गेटबाहेर रस्त्यावर आरोपी राजु व विजय सोनुने यांनी अचानक हल्ला चढवून फिर्यादी दिपक व त्याचे बंधू सुधाकर व परमेश्वर यांना मारहाण केली. या झटापटीत विजय सोनुने याने परमेश्वर बाबुराव सोनुने यांच्या डोक्याच्या मागे विट मारून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आणि जखमीला ग्रामीण रुग्णालय, जाफ्राबाद येथे दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय, जालना येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान परमेश्वर सोनुने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १९४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109, 115, 352, 351(2)(3), 3(5) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूची नोंद झाल्यानंतर सदर गुन्ह्यात कलम 103 (खून) ची वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी 1) राजु सुखदेव सोनुने व 2) विजय उर्फ विजु सुखदेव सोनुने यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.


0 टिप्पण्या