Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांचं थेट तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण! लहानग्यांचाही “रस्ता द्या! शाळेत जायचंय!” असा टाहो


गणेश पगारे 

मौजे येवता (ता. जाफ्राबाद) येथील शेतकऱ्यांनी अखेर हतबल होऊन न्याय मागण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. गट क्रमांक ३३ मधून शेतामध्ये जाणाऱ्या वहीवाटीचा रस्ता गैर-अर्जदार वेनुबाई अंबादास ससोदे यांनी २०२३ मध्ये अडवून टाकल्यापासून शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.

शेतकऱ्यांचा संताप उफाळला, लहान मुलांचा आवाजही आक्रोशात मिसळला!

या रस्त्यावरूनच अनेक शेतकरी आपल्या शेतात व घरात ये-जा करतात. मुलांना शाळेत नेण्यासाठी, वयोवृद्ध आई-वडिलांच्या औषधपाण्यासाठी, शेतीच्या कामासाठी याच रस्त्याचा उपयोग होतो. मात्र तो बंद झाल्यामुळे सगळेच अडकल्यासारखे झाले आहेत.

शेतकऱ्यांनी या संदर्भात तहसिलदारांकडे तक्रार केली होती. १५ मे २०२४ रोजी तहसिलदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आदेशही दिला. परंतु आजतागायत त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

९ जून, १८ जून आणि २० जून रोजी संबंधित महसूल व पोलिस अधिकारी प्रत्यक्ष शिवारात गेले, पंचनामा झाला... पण रस्ता अजूनही बंदच!

शाळकरी मुलांचाही मोठा सहभाग – “रस्ता द्या, शाळेत जायचंय!”

या आंदोलनात लहान मुलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हातात फलक घेऊन लहानगं रडवेल्या आवाजात ओरडत आहेत – “आम्हाला शाळेत जायचंय... रस्ता द्या, रस्ता द्या!”हा आवाज ऐकून उपस्थितांची मने चटका लावून जात आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप – प्रशासनाकडून दुर्लक्ष!

उपोषणकर्ते शेतकरी अजंदर, दगडू तोताराम सिरसाट व अन्य सर्वांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितलं की, "सरकार आमच्यासाठी आदेश काढते, पण अधिकारी ते पाळत नाहीत. आम्हाला न्याय कुठे मिळायचा?"

प्रशासन गप्प, शेतकरी मैदानात!

रस्ता अडवण्याचा प्रकार केवळ अन्याय नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखा आहे. आता तहसिलदारांनी ७ जुलै २०२५ पर्यंत रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही हवेतच विरले.

शेतकऱ्यांचा इशारा – रस्ता खुला झाला नाही, तर आंदोलन तीव्र करू!

"आता पुरे झालं! रस्ता खुला झाला नाही, तर पुढचं आंदोलन तहसिल नाही तर जिल्हा स्तरावर नेऊ!" – असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या