Ticker

6/recent/ticker-posts

जाफराबाद तालुक्यात वाळूच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

'मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते'



गणेश पगारे 

जाफ्राबाद,जालनाः इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या या गझलेची आठवण यावी अशी हृदय पिळवटून टाकणारी आणि मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात भल्या पहाटे सर्वजण साखरझोपेत असताना घडली. रात्री उशिरापर्यंत सिमेंटच्या गोण्या बाहून दमल्यानंतर भाकरीचे दोन घास पोटात टाकून निपचित झोपलेल्या कामगारांना शनिवार, २२ फेब्रुवारी रोजीचे सूर्यदर्शनही घेता आले नाही. ज्या वाळूच्या कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्याच वाळूच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून त्यांचा असा अंत पाहून कुणाच्याही काळजाला पिळ पडल्याशिवाय राहत नाही. या घटनेत मृत्युमुखी पडलेले पाचही कामगार हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीच्या कुटुंबातील सदस्य होते.

जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशातच वाळू माफिया आणि महसूल विरुद्ध पोलीस असा संघर्ष जिल्ह्यात सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना समोर आल्यामुळे सामन्यांच्या भावना देखील तीव्र झाल्या आहेत. जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ शिवारात शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या पाच कामगारांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

अवैधरीत्या वाळू घेऊन आलेल्या टिप्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळे या पाच कामगारांचा करुण अंत झाला. या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोषींना कदाचित शिक्षा देखील होईल. पण, हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या या कामगार कुटुंबांचे आधारच हरवले गेले आहेत, त्यांचे काय होईल? हा प्रश्न विचलित करणारा आहे.
सुनील गेला; कुटुंब पोरके झाले

सुनील गेला; कुटुंब पोरके झाले

भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील सुनील सपकाळ हा अविवाहित तरुण वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सपकाळ कुटुंब पोरके झाले. सहा महिन्यापूर्वी सुनीलच्या वडीलांनी जगाचा निरोप घेतला आणि आता घरातील कर्ता सुनीलही सोडून गेल्यामुळे कुटुंबातील त्याची आजी, आई, धाकटी बहीण पोरके झाले, अशी माहिती पत्रकार हरी बोराडे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील दहीद येथील राजेंद्र वाघ हे देखील गरीब कुटुंबातील. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनवई कुटुंबाने कर्ते पुरुष गमावले


सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील गणेश धनवई यांचे गरीब कुटुंब. वाट्याला दीड एकर शेती. मात्र, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार म्हणून गणेश धनवई हे बांधकामे करतात. ते पत्नी संगीताबाई, मुलगा भूषण, मुलगी धनश्री यांना घेऊन पासोडी येथे कामावर होते. वाळूच्या ढिगाऱ्याखाली मुलगा भूषण आणि मुलगी धनश्रीसह ते स्वतः दबले गेले. यात बापलेकाचा मृत्यू झाला. सुदैवाने मुलगी धनश्री वाचली. या कुटुंबातील दोघेही कर्ते पुरुष गेल्यामुळे संगीताबाई आणि धनश्रीवर जणू आभाळ कोसळले आहे. हे कुटुंब शनिवारी धावडा (ता.भोकरदन) येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाणार होते. धनवई कुटुंब गावातील सर्वांशी प्रेमाने राहत होते, सायंकाळी गोळेगाव येथे बापलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.

जीवावर उठलेला वाळूचा व्यवसाय

जालना जिल्ह्यातील निवडक नद्यांच्या पात्रातून वाळू माफियांचे मोठे नेटवर्क उभे राहिलेले आहे. अर्थात या धंद्याला राजकीय वरदहस्त, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध घट्ट बनलेले असल्यामुळे हा धंदा बंद होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे हा वाळूचा अवैध रित्या चालणारा व्यवसाय पर्यावरणासोबतच नागरिकाच्या जिवाशी देखील खेळ करत आहे. जाफराबाद येथील ही घटना याचे जीवंत उदाहरण आहे. प्रशासनाला अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात. फक्त प्रशासनाने कर्तव्यनिष्ठपणे काम केले पाहिजे.

प्रशासन गंभीर होणार कधी ?

जालना जिल्ह्यातील वाळू उत्खनन, वाहतूक, विक्री, महसूल पथकावर होणारे हल्ले, वाळू माफियांचे महसूल, पोलीस प्रशासनातील अर्थपूर्ण संबंध याबाबत यापूर्वी राज्यभरात अनेक प्रकरणे गाजलेली आहेत. इतकेच नव्हे तर महसूल आणि पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये तर वाळू माफियांकडून मिळणाऱ्या बिदागी वरून देखील जुंपलेली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल संघटनांनी पोलिसांच्या विरोधात निषेध मोर्चा याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे जिल्ह्यात असे प्रकार थांबले पाहिजे. यासाठी प्रशासन गंभीर होणार आहे काय? हा सवाल उपस्थित झाला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या