गणेश पगारे
भोकरदन, ३ मार्च: भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे भोंदूबाबाच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी, ३ मार्च रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०) असे आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच संशयित आरोपी गणेश दामोधर लोखंडे (रा. धामणगाव, ता. जि. बुलडाणा) या भोंदू बाबाला ताब्यात घेतले आहे.
घटनाक्रम
ज्ञानेश्वर आहेर यांनी आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना एमएलसी पत्रकाद्वारे माहिती दिली.
पोलीस अंमलदार रानगोते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, मयताच्या कपड्यांमध्ये भोंदू बाबा गणेश लोखंडे याच्या नावाची लेखी चिठ्ठी मिळाली. यानंतर मंगळवारी, ४ मार्च रोजी मृताच्या पत्नी अंजना आहेर यांच्या फिर्यादीवरून गणेश लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस तपास व अटक
भोकरदन पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेटके, मोहिते, पोलीस अंमलदार गुसिंगे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. अवघ्या दोन तासांतच गुप्त माहितीच्या आधारे गणेश लोखंडे याला गुम्मी येथून अटक करण्यात आली.
बुधवारी, ५ मार्च रोजी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोंदूबाबाच्या त्रासामुळे आत्महत्या
अंजना आहेर यांच्या फिर्यादीनुसार, मृत ज्ञानेश्वर आहेर व त्यांची पत्नी अंजना हे देवदर्शनासाठी धामणगाव (बुलढाणा) येथे जात असत. तेथे त्यांची ओळख भोंदू बाबा गणेश लोखंडे याच्याशी झाली. त्यानंतर गणेश लोखंडे याने अंजनाला वारंवार त्रास द्यायला सुरुवात केली.
तो तिला लेखी चिठ्ठ्या व फोनद्वारे संपर्क करून मानसिक त्रास देत होता. त्याने अंजनाला धमकी दिली होती की, "तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे, ती मला पाहिजे, नाहीतर मी तुमच्यावर ५ ते १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करेन." या प्रकारामुळे आहेर कुटुंबीय तणावाखाली होते. सततच्या या मानसिक छळामुळेच ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
गावात संतापाची लाट
या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी अशा भोंदूबाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही अशा अंधश्रद्धेच्या नावा खाली लोकांना फसवणाऱ्या भोंदूबाबांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0 टिप्पण्या