Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदनमध्ये भरधाव बोलेरोने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, चालक फरार

 

गणेश पगारे 

भोकरदन – शहरात शुक्रवारी सायंकाळी एका दुर्दैवी अपघातात भरधाव बोलेरो गाडीने दुचाकीस्वार महिलेला चिरडले. या भीषण अपघातानंतर वाहनचालकाने महिलेला फरफडत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ही घटना भोकरदन शहरातील बुलढाणा अर्बन बँकेसमोर घडली. दिपाली महेंद्र बाकलीवाल (वय 46 वर्षे) या आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना महिंद्रा बोलेरो (MH 20/ 6951) या गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून, स्थानिकांनी तत्काळ त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

दारूच्या नशेत होता वाहनचालक?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी बोलेरो गाडीचा चालक दारूच्या नशेत होता. धडक दिल्यानंतरही त्याने गाडी न थांबवता महिलेला काही अंतर फरफडत नेले, यामुळे संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

गाडी पोलिसांच्या ताब्यात, चालक फरार

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी बोलेरो गाडी ताब्यात घेतली आहे. प्राथमिक चौकशीत ही गाडी कुंभारी येथील मिर्झा यांच्या मालकीची असल्याचे समजते.

पोलीस कारवाई आणि नागरिकांचा संताप

अपघातानंतरही पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांनी चालकाला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे सूत्रांकडून कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या