Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर शिवारात आसई फाटा येथे अवैध दारू जप्त.



कोल्हापूर शिवारात आसई फाटा येथे अवैध दारू जप्त

मारुती स्विफ्ट डिझायरसह ६.४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गणेश पगारे 

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारूचे 30 बॉक्स व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गुप्त बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार जाफ्राबाद–भोकरदन रोडलगत कोल्हापूर शिवारातील आसई फाट्याजवळील एका घरा समोर उभ्या असलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर (MH 05 AX 8126) गाडीमध्ये अवैध दारूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि वसुदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. वाहनाची झडती घेतली असता, ‘देशी दारू भिंगरी संत्रा’ लेबल असलेले 11 खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या 48 सीलबंद बाटल्या होत्या.

या वाहनासंबंधी चौकशी केली असता, ते वाहन बालाजी साहेबराव जाधव (रा. कोल्हापूर) यांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कोल्हापूर येथील घराचीही झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान अशाच प्रकारचे आणखी 19 बॉक्स आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 30 बॉक्स (1,440 बाटल्या) 'भिंगरी संत्रा' देशी दारू अंदाजे 1,44,000 रुपये किमतीचे व कार (मारुती स्विफ्ट डिझायर) अंदाजे 5,00,000 रुपये किमतीची असा एकूण 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले.

कारवाईत पोनि प्रताप इंगळे, सपोनि वैशाली पवार, पोउपनि वसुदेव पवार, तसेच सफौ जनार्धन भापकर, पो.ह. गजानन गावंडे, पो.ह. अरुण वाघ, पोकॉ विजय जाधव, संदीप भागिले, संदीप गवई आणि होमगार्ड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या