Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव प्रेम! पोलिसांचा पाठलाग, नाकाबंदी आणि प्रेमीयुगुल पालकांच्या ताब्यात!


गणेश पगारे

मलकापूर येथून घरच्यांच्या नकळत पळून गेलेले प्रेमी युगुल अखेर पोलिसांच्या कारवाईत पकडले गेले. गुरुवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद कार दिसताच पाठलाग सुरु झाला. भरधाव वेगाने कार पळवणाऱ्या चालकाला रोखण्यासाठी जाफ्राबाद व भोकरदन पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली आणि प्रेमीयुगुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

गुरुवार रात्री दीडच्या सुमारास जाफ्राबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजय देशपांडे, विजय जाधव आणि अनंता डोईफोडे हे माहोरा परिसरात गस्त घालत असताना एमएच २८ सीसी ११२१ क्रमांकाची कार अत्यंत संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने गाडी जबरदस्त वेगाने पळवली.

पोलिसांनी तात्काळ भोकरदन पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सापळा रचला. उपनिरीक्षक संतोष कुकलारे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करण्यात आली. काही मिनिटांतच संबंधित कार तिथे येताच पोलिसांनी तिला थांबवले. कारची झडती घेतली असता एक तरुण व एक तरुणी आढळून आले.

चौकशीत दोघांनी पुण्याकडे जात असल्याची कबुली दिली. मात्र त्यांच्या अंगावरील थरथर आणि घाबरलेली स्थिती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही.त्यांना भोकरदन पोलिस ठाण्यात आणण्यात आले,अधिक विचारपूस केल्यानंतर उघडकीस आले की, दोघेही मलकापूरचे रहिवासी असून घरच्यांना न सांगता पळून गेले होते.

यानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. समुपदेशन घेतल्यानंतर व दोघांच्याही परस्पर संमतीने अखेर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता कौटुंबिक समजुतीने विषय हाताळण्यात आला.

ही कारवाई करताना पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संयम कौतुकास्पद असून नागरिकांतून याचे स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या