गणेश पगारे
माहोरा : जागतिक महिला दिनानिमित्त ग्राम संसद कार्यालय, माहोरा येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन लहाने होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या हक्कांविषयी आणि त्यांच्या विकासासाठी समाजाने सकारात्मक भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.
या सभेत बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी विशेष प्रयत्न, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपयोजना, तसेच पतीच्या निधनानंतर अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आले.
सहाय्यक ग्रामविकास अधिकारी संजीवनी पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात स्त्रियांना न्याय मिळत होता, त्याचप्रमाणे आजही शासनाने महिलांना न्याय द्यावा, तसेच अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. महिलांचे सशक्तीकरण होईल, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामसभेत दादाराव गडकरी,संगीता मोहिते,दुर्गा शिंदे, रेखा हिवाळे, शिवगंगा चिंचोले, सुलोचना गिरी, सोनू बावस्कर, मनीषा तांगडे, करुणा लोखंडे, कांता गडकरी, मालिका बोर्डे, चंद्रकला काकफळे, सुरेखा चौतमोल, दुर्गा शिरसाट यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक आणि शासकीय योजनांची माहिती दिली आणि महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यावर भर दिला.

0 टिप्पण्या