Ticker

6/recent/ticker-posts

सावत्र आजीवर नातवाचा हल्ला: डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी, घाटीत मृत्यूशी झुंज

 

गणेश पगारे 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलुद येथे घरगुती वादातून सावत्र आजीवर नातवाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. १ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अमोल गुजर उर्फ गोट्या याने आपल्या ७५ वर्षीय सावत्र आजी गंगुबाई बंशी जाधव यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रभर मदतीविना पडून राहिल्या जखमी आजी

हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, तर आजी गंगुबाई जाधव रात्रभर मदतीविना पडून राहिल्या. २ एप्रिलच्या सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.


पोलीसांची जलद कारवाई, आरोपी अटकेत 

सदर घटनेची माहिती पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांना मिळताच त्यांनी तातडीने घाटी रुग्णालयात धाव घेतली व जखमी महिलेचा जबाब नोंदवला. तसेच, फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. या प्रकरणात पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माने, बीट जमादार शिनकर, भालके तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ ए. एस. खालसे आणि चालक भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलीसांनी संशयित आरोपी अमोल गुजर उर्फ गोट्या याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारध पोलीस करत आहेत.


घरगुती वादाचे गंभीर परिणाम

या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती वादातून वृद्ध महिलेवर असा हल्ला होणे हे सामाजिक दृष्टिकोनातून चिंतेचे कारण आहे. या घटनेने कुटुंबीय तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या जलद हालचालीमुळे आरोपीला अटक करण्यात यश आले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या