गणेश पगारे
माहोरा, ३ मार्च – माहोरा येथे प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना व पानलोट सिंचन क्षेत्र विभागांतर्गत भव्य रथ यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही यात्रा ग्रामसभेपर्यंत पोहोचली. या यात्रेचा उद्देश जलसंधारणाच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा होता.
पाणी पातळी टिकवण्यासाठी ठोस उपाययोजना
यावेळी जिल्हा समन्वयक तुकाराम भोजणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, भूगर्भातील जलपातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेलेली आहे. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी "पाणी आडवा, पाणी जिरवा" हा मंत्र महत्त्वाचा असून, नदी-नाल्यांवर छोटे-मोठे सिमेंट बंधारे बांधणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, शेतात समतोल वळणे तयार करणे यासारख्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
माहोरा परिसरातील चार गावे योजनेत समाविष्ट
या पानलोट सिंचन क्षेत्र योजनेत माहोरा परिसरातील चार गावे समाविष्ट करण्यात आली असून, या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी रथ यात्रेद्वारे जनजागृती केली जात आहे.
प्रमुख मार्गदर्शकांचे विचार
कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक एस.एस. वाघमारे, गटविकास अधिकारी एन.टी. खिल्लारे, सरपंच गजानन पा. लहाने, उपसरपंच बाबासाहेब बोरसे, म्हसरूळचे सरपंच मंगेश लहाने, कृषी विस्तार अधिकारी नवले, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या योजनेच्या फायद्यांवर प्रकाश टाकत जलसंधारणाच्या गरजेवर भर दिला.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामविकास अधिकारी रावसाहेब दांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पाणलोट क्षेत्र विकासासाठी ठोस पावले
राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून, पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे


0 टिप्पण्या