महेश गवले
माहोरा: चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयाचा आनंद जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संघाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर माहोरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जल्लोष साजरा केला. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत, 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी मुलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात युवराज डेंगणे, रवी साळोक, कृष्णा वाघ, बबन वाघ, राहुल वाघ, महेश गवले, मंगेश करंडे, साई पोफळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. गावकऱ्यांनी भारतीय संघाच्या या शानदार कामगिरीचे कौतुक करत संघातील खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारताच्या या विजयामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून, माहोराकरांनीही आपल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करून देशाच्या विजयी क्षणात आपला सहभाग नोंदवला.

0 टिप्पण्या